केळीसह कापसाला भावासह प्रयत्न करणार : मंत्री अनिल पाटील
Will try with banana along with cotton : Minister Anil Patil भुसावळ : शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या केळीसह कापसाला भाव मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असून शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशी ग्वाही भुसावळ भेटीप्रसंगी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. शेतकर्यांसाठी मी सत्तेत असो किंवा नसलो तरी मी मागणी लावून धरणार असल्याचे ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील जागावाटपा संदर्भात मी बोलणे उचित नाही कारण तो अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे मात्र अधिकाधिक जागा राष्ट्रवादीने लढाव्यात, असे प्रामाणिकपणे वाटते. आघाडी अलायन्समध्ये ठरेल त्याप्रमाणे लढणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
कुठल्याही खात्याला हरकत नाही
मागचा काळ चांगला असलातरी त्यात निर्णय न झाल्याने आम्ही सत्तेत सहभागी झाले असून विकासासाठी एकत्र आलो आहोत. खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याने नाही खाते मिळालेतरी हरकत नाही, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह राहील व शरद पवार साहेबांविषयी आदर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

जितेंद्र आव्हाडांचे आव्हान म्हणजे नौटंकी
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटात गेलेल्या सर्वांना परत येण्याच्या केलेल्या आवाहनबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले की, त्यांनी खरे भावनिक आव्हान केले नसून ही त्यांची नौटंकी असल्याचा दावा मंत्री पाटील यांनी रावेर भेटीत केला. बुधवारी पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री अनिल पाटील रविवारी रावेरात आले होते. त्यांनी मयत सुधीर पाटील व ईकबाल शेख कुरेशी यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, रवींद्र पाटील, राजेश वानखेडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार गट दौर्यापासून लांब
मंत्री पाटील यांचा पहिलाच रावेर तालुका दौरा होता मात्र या दौर्यात तालुक्यातील दोन-तीन पदाधिकारी वगळता शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी लांबच राहिले. पत्रपरीषदेत जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन उपस्थित होते. माजी आमदार अरुण पाटील यांच्याशी फोनवरून बोलणे झाले असून ते आमच्यासोबत असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी बाजार समितीतर्फे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, सचिव गोपाळ महाजन उपस्थित होते.
