अपघात सत्र कायम : जळगावात डंंपरच्या धडकेने युवक ठार
जळगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डंपरने दुचाकीला धडक दिल्याने शहरातील 35 वर्षीय युवक ठार झाला. हा अपघात शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलाजनजीक मंगळवार, 11 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. स्वप्नील सुरेश जोशी (35, देविदास कॉलनी, जळगाव) असे मृताचे नाव आहे.
अपघातानंतर डंपर चालक पसार
जळगाव शहरातील देविदास कॉलनी परीसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. प्रेम नगरात त्याचे किराणा दुकान होते. मंगळवार, 11 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा तरुण दुचाकी (एम.एच.19 बी.एस.413) ने इच्छादेवी चौकाकडून देवीदास कॉलनीकडे जाण्यासाठी आकाशवाणी चौकातून जात असताना गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणार्या डंपर क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.5788) ने ओव्हरटेक करत असतांना दुचाकीला जोरदार धडक दिल्याने स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक हा डंपर सोडून पसार झाला.
आकाशवाणी चौकात वाहतूक शाखेचे गस्तीवर असलेले हवालदार हर्षद गवळी आणि चालक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वप्नीला दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. रामानंद नगर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे. तरुणाच्या पश्चात आई स्मीता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद (4), मुलगी समीक्षा आणि भाऊ असा परीवार आहे.


