पाचोरा शहरातील प्रेम विवाह केलेल्या नवविवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांना अटक
Suicide of newlyweds in Pachora city : Four arrested including husband पाचोरा : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या व नुकत्याच शहरात वास्तव्यासाठी आलेल्या 19 वर्षीय नवविवाहितेने गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या आईने केल्यानंतर या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
असे आहे नेमके प्रकरण
पाचोरा तालुक्यातील कुर्हाड तांडा येथील रहिवासी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहातांडा, ता.जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हिला आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणार्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा 10 जुलै रोजी काजलसोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.
चौघांना पोलिसांकडून अटक
दरम्यान, गुरुवारी 13 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजलने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजलला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी रेखा प्रकाश वाजे (36, पळासखेडा काकर, ता.जामनेर) यांच्या फिर्यादीवरून पती राहुल संभाजी चव्हाण, मुक्ताबाई संभाजी चव्हाण, रवी संभाजी चव्हाण, मानाजी बद्री चव्हाण, रुपाली मानाजी चव्हाण, सुप्राबाई बद्री चव्हाण (कुर्हाड, ता.पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल, मुक्ताबाई, रवी व सुप्राबाई चव्हाण यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.


