दीपनगर प्रकल्पबाधीत गावातील सुशिक्षिताना प्रशिक्षणार्थी पदाची संधी

मुंबईतील बैठकीत आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा : बेरोजगारांच्या हातांना मिळणार काम


Under Deepnagar project, opportunity of trainee position for well-educated people of the village
भुसावळ :
दीपनगर प्रकल्पाने बाधीत झालेल्या गावातील सुशिक्षीत बेरोजगारांना आगामी काळात दीपनगर प्रकल्पात प्रशिक्षणार्थी म्हणून दोन वर्ष काम करण्याची संधी दिली जाणार असून पहिल्या वर्षी साधारण सहा हजार स्टायपेंड मिळेल तर दुसर्‍या वर्षी त्यात वाढ होवून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. मुंबईतील प्रकाशगढ येथे झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अनेक समस्या यावेळी निदर्शनास आणून दिल्या. बैठकीत चर्चेनुसार दीपनगर प्रकल्पाला लागून असलेला पाच किलोमीटरच्या परीघातील वरणगाव, खडका, कंडारी आदी गावांना लागून असलेला काही भाग आता नव्याने समाविष्ट होणार असून सीएसआर निधीतून आता आगामी काळात कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सीएसआर निधीतून होणार विविध कामे
भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे, खडका, कंडारी, वरणगाव, साकरी फाटा आदी गावांचा दीपनगर प्रकल्पांतर्गत सामाजीक दाायीत्व योजने अंतर्गत समावेश करण्याची मागणी आमदारांनी केली. या गावांना आता सीएसआर निधीतून कामे करण्याचा मार्गही त्यामुळे मोकळा झाला आहे शिवाय प्रकल्प अंतर्गत फुलगाव, पिंप्रीसेकम, कठोरा आणि अंजनसोंडे, साकरी शिवार या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करून लवकर काम सुरू करावे, अशी मागणी आमदारांनी लावून धरल्यानंतर ती मंजूर करण्यात आली. प्रकल्पबाधीत गावांमधील बेरोजगार मुलांना दोन वर्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांना मासिक पगार द्यावा आदी विषयावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

चर्चेअंतर्गत सदरील गावांमधील मुलांना लवकरच जाहिरात काढून प्रत्येक वर्षी 200 मुलांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्याचे बैठकीत ठरले. या बैठकीला आमदार संजय सावकारे, सरपंच परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी सरपंच राजकुमार चौधरी, अतुल झांबरे, रवींद्रसिंग चाहल, संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी, ब्रिजलाल पाटील, जितेंद्र वारके, गणेश तायडे तसेच शेतकरी उपस्थित होते. यावेळी वीज कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !