नाथाभाऊंची स्पष्टच कबुली ; 602 कॅबीन मिळाल्यानंतर माझ्यावरही झाले आरोप
Nathabhau’s clear confession ; After getting 602 cabin I was also accused भुसावळ : मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कॅबीन 602 हल्ली कुणीही मंत्री घेत नसल्याने राज्यातील राजकारण्यांमध्ये हा विषय नेहमीच चर्चिला जातो. भुसावळात शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत माजी मंत्री एकनाथराव खडसेंना हा मुद्दा छेडल्यानंतर त्यांनीदेखील आपल्यालाही सत्तेत असताना ही कॅबीन मिळाली मात्र त्यानंतर आपल्यावरही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याची स्पष्टपणे कबुली येथे दिली. मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरची ही एक कॅबीन शापीत असल्याची चर्चा अनेकदा होते तर आता अजित पवारांनी ही कॅबीन नाकारल्यानंतर पुन्हा त्याबाबत चर्चेला सुरूवात झाली आहे.
खडसे म्हणाले कॅबीन मिळाल्यावर अनेकांवर आरोप
खडसे म्हणाले की, 2014 आधी 602 नंबरच्या कॅबीनमध्ये अजित पवार बसले होते. त्यानंतर त्यांच्यावरही आरोप झाले तर नारायण राणेंना आरोपानंतर राजीनामा द्यावा लागला तर विजयकुमार गावीत असो की मी माझ्यावर आरोप झाले त्यामुळे कदाचित अनेक जण पायउतार झाल्यानेच 602 क्रमांकाची कॅबीन घेण्यास कुणीही तयार नसावे, असेही त्यांनी भुसावळात सांगितले.

असा आहे 602 क्रमांकाच्या कॅबीनचा इतिहास
अजित पवारांना 2014 मध्ये ही कॅबीन मिळताच सिंचनसह शिखर बँकेवरुन घोटाळ्याचे आरोप झाले. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर 602 केबिनमध्ये आले. खडसेंच्या कृषीखात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मात्र त्यांचं अकाली निधन झालं. भाजपचे अनिल बोंडे 602 कॅबीनमध्ये आले व कृषीखात्याची जबाबदारी बोंडेकडे आली मात्र मंत्री असूनही 2019 च्या निवडणुकीत बोंडेंचा पराभव झाला.
