Ishalwadi ईशाळवाडीवर डोंगर कोसळला : दहा जणांचा मृत्यू ; अनेक जण दबल्याची भीती


Mountain collapses at Ishalwadi : 10 dead ; Many are afraid of being overwhelmed
खालापूर :
खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी वस्तीवर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत असून अनेक जण दरडीखाली दबल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगार्‍याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर आतापर्यंत 10 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे.

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची धाव
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आश्वस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी उपस्थित होते. दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.





रुग्णांवर शासनामार्फत होणार उपचार
दरड कोसळून जखमी झालेल्या नागरीकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरीक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना आदिती तटकरे यांना दिल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !