जळगाव गोळीबाराने हादरले : केसी पार्कमध्ये हवेत झाडल्या बंदुकीच्या तीन फैरी
Jalgaon rocked by gunfire : Three gunshots fired in the air at KC Park जळगाव : जळगावातील के.सी.पार्क परीसरात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास टोळक्याने धुडगूस घालत हवेत गावठी कट्ट्यातून तीन फैरी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अस्पष्ट असलेतरी खंडणीच्या प्रकारातून ही घटना घडल्याची चर्चा असून पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून झाडण्यात आलेल्या गोळीच्या तीन रीकाम्या पुंगळ्या आढळल्याने त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
टोळक्याचा धुडगूस : जळगावात खळबळ
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवर के.सी.पार्क कॉलनीती शुभम माने हा वाळू व्यावसायिक राहतो. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घातला. यावेळी माने खाली न आल्याने टोळक्याने हवेत तीन फैरी झाडल्या तसेच मानेच्या घरावरही दगडफेक केल्याची माहिती आहे. त्यानंतर टोळीने धमकावत पलायन केले.
पोलीस अधिकार्यांची धाव
गोळीबाराची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन पाटील आदींसह शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी धाव घेतली.
दरम्यान, गोळीबार प्रकरणी काही संशयितांना यंत्रणेने चौकशीकामी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गोळीबाराच्या कारणांचा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माने यांनी काही तक्रारदारांची नावे सांगितल्यानंतर या प्रकाराची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


