जळगावातील गोळीबार प्रकरण : परस्परविरोधी गुन्हे : आठ संशयितांना अटक
Jalgaon firing case: Conflicting crimes: Eight suspects arrested जळगाव : जळगावच्या वाळू व्यावसायीकावर गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली मात्र याप्रकरणात दोन्ही गटांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, सहा आरोपींना पाच दिवस तर दोन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पैसे न दिल्याने दगडफेक करीत गोळीबार
जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर माने आणि परीवारासह वास्तव्याला आहे. खंडणीची मागणी आणि पैशांवरून मयूर माने यांचा चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे साथीदार असलेल्या तरुणांशी वाद सुरू होता. यापूर्वी तरुणांनी चिंग्याला जेलमधून सोडण्यासाठी पैशांची मागणी करत शिवीगाळ व धमकी दिली त्यामुळे घाबरून शुभमने वेळोवळी फोन-पे ने पैसे दिले होते. अजून पुन्हा पैशांची मागणी करण्यासाठी गुरूवार, 27 जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मयूर माने हा आपल्या परीवारासह घरी असतांना सात ते आठ तरूणांनी घरासमोर येवून शिवीगाळ व दगडफेक केली. त्यामुळे माने कुटुंबिय घराचा दरवाजा बंद करून घरात गेले. त्यावेळी घराच्या खाली उभे असलेल्या तरुणांनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर गोळीबार केला. त्यानंतर पसार झाले.
दुसर्या गटानेही केला पहिल्या गटावर गोळीबाराचा दावा
जळगाव शहरातील संत मीराबाई नगरात चेतन रमेश सुशीर हा आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. चेतनची गेल्या काही वर्षापासून शुभम माने याची ओळख आहे. सात महिन्यांपूर्वी शुभम माने याने चेतनकडे उसनवारीने पैसे मागितले होते. जास्त पैसे मिळतील या उद्देशाने चेतन सुशीर आणि उमाकांत दत्तात्रय धोबी यांनी मिळून 80 हजार रुपये दिले. त्यानंतर चेतन आणि उमाकांत यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली असता शुभम माने हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता त्यामुळे चेतन सुशीर हा त्याचे मित्र लखन मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे, समीर सोनार, बंटी बांदल यांना सोबत घेवून गुरूवार, 27 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शुभमच्या घरी आले. त्यावेळी पैशांची मागणी केली असता शुभमने शिवीगाळ केली. त्यानंतर आलेल्या तरूणांवर दोन वेळा गोळीबार करण्यात आला व त्यानंतर सर्वजण जीव वाचवून पळत सुटले.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
गुरूवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडल्यानंतर परीसरात खळबळ उडाली होती. सुरूवातीला नेमके काय झाले हे स्थानिक नागरीकांना समजले नाही. गोळीबार झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पीआय किसन नजन पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
गोळीबार प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यात पहिल्या फिर्यादीनुसार लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे (शिवाजी नगर), लक्ष्मण शिंदे (शिवाजी नगर), नरेश शिंदे (शिवाजी नगर), उमकांत दत्तात्रय धोबी (संत मिराबाई नगर, जळगाव), समीर शरद सोनार (फारेस्ट कॉलनी, जळगाव), राजेश उर्फ बंटी सदाशीव (बांदली, रा.उस्मानिया पार्क, जळगाव), चेतन रमेश सुशीर (मिराबाई नगर, जळगाव), चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या (तुकाराम वाडी, जळगाव) आणि महेश मराठे (शिवाजी नगर, हुडको, जळगाव) यांच्यावर गुन्हे दाखल करण्या आले. दुसर्या गटातर्फे शुभम अशोक माने आणि मयूर अशोक माने (दोन्ही रा.कानळदा रोड, जळगाव) यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ आरोपींना पोलिसांकडून अटक
लखन दिलीप मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे (शिवाजी नगर, हुडको, जळगाव), उमाकांत दत्तात्रय धोबी (संत मिराबाई नगर, जळगाव), समीर शरद सोनार (फॉरेस्ट कॉलनी, जळगाव), राजेश उर्फ बंटी सदाशीव बांदल (उस्मानीया पार्क, जळगाव) तसेच शुभम अशोक माने व मयूर अशोक माने (के.सी.पार्क, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. आधीच सहा आरोपींना पाच दिवस तर नंतरच्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.


