जळगावात प्लायवूड व्यावसायीककडे धाडसी घरफोडी
Daring burglary at plywood business in Jalgaon जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून बंद घरे चोरट्यांना पर्वणी ठरू पाहत आहेत. शहरातील जिजाऊ नगरातील बंद घरातून चोरट्यांनी 38 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी प्रकाश भगवान खैरनार (48) यांनी तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला.
बंद घर चोरट्यांना आयतीच संधी
जळगावातील प्लायवूडचे व्यावसायीक प्रकाश खैरनार यांच्या सासूंचे 29 जुलै रोजी रात्री निधन झाल्याने खैरनार कुटुंबीय रात्री 11 वाजता मालेगाव येथे गेले. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. 30 रोजी सकाळी शेजारील महिलेला खैरनार यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी या विषयी माहिती दिली. सोबतच पोलिसांनाही या विषयी माहिती देण्यात आल्याने तालुका पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार, हवालदार विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, दिनेश पाटील, उमेश ठाकूर, अनिल फेगडे आदींनी धाव घेत पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.






अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
खैरनार कुटुंबीय 30 रोजी रात्री घरी परतले त्यावेळी पाहणी केली असता घरातील 20 हजार रुपये रोख, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, पाच चांदीचे शिक्के, 200 ग्रॅम वजनाची महालक्ष्मी मातेची मूर्ती असा एकूण 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी खैरनार यांनी जळगाव तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


