भुसावळात हद्दपार आरोपीवर प्राणघातक हल्ला
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल दिव्येशपासून काही अंतरावर हद्दपार आरेापी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) याच्यावर काही संशयीतांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.
आरोपीविरुद्ध दाखल होता गुन्हा
भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांना विनाकारण शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर संजय चौधरी यांनीही नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध शिवीगाळ तसेच दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपीवर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आरोप

महामार्गावर आरोपीवर हल्ला
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल दिव्येश गार्डनजवळील पेट्रोल पंपासमोर आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर काहींनी त्याच्यावर लाकडी दांडा व बांबूने हल्ला चढवला. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे विकास सातदिवे, रमण सुरळकर, महेश चौधरी, ईश्वर भालेराव यांनी धाव घेत मुन्ना यास जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आरोपी मुन्ना संजय चौधरी यास हद्दपार करण्यात आले होते तर दोनदा त्याने आदेशाचे उल्लंघण केल्याने त्याच्याविरुद्ध कारवाईदेखील झाली होती मात्र पुन्हा हद्दपार आरोपी शहरात आलाच कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने शहरात हद्दपार आरोपींसह गुन्हेगारांनी डेरा टाकला आहे. अप्रिय घटना घडण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने झोप उघडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


