आमदार चिमणराव पाटल यांच्या वाहनाला अपघात


MLA Chimanrao Patil Vehicle met with an accident अमळनेर : पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ अपघात झाला. त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या पोलीस व्हॅननेच त्यांच्या कारला मागून धडक दिलली मात्र सुदैवाने आमदार चिमणराव पाटलांना दुखापत झाली नाही, अशी माहिती त्यांचे चिरंजीव अमोल पाटील यांनी दिली. या अपघातात पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचे नुकसान झाले आहे.

स्पीडब्रेकर ओलांडताना चालकाचा ताबा सुटून पोलिसांचे वाहन हे आमदार पाटील यांच्या वाहनाला धडकल्याची प्राथमिक माहिती आहे.







आमदार चिमणराव पाटील हे रविवार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी चोपडा येथे नातेवाईक वारल्याने त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. तेथून परतत असताना अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ त्यांच्या वाहनाने स्पीडब्रेकर ओलांडला मात्र त्यांच्या मागे येणार्‍या पोलिसांच्या वाहनातील चालकाला ताबा सुटल्याने पोलिसांचे वाहन आमदारांच्या वाहनाला धडकले. यात आमदार पाटील यांच्या वाहनाचे मागील बाजूने नुकसान झाले.

अपघातानंतर पोलिसांच्या वाहनातील एअरबॅग उघडली होती. पोलिसांच्या वाहनात 4 ते 5 जण असल्याची माहिती मिळाली. दोघेही वाहनातील कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन तथा आ. चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांनी दिली. आमदार पाटील यांच्यासोबत वाहनात चालकासह स्वीय सहाय्यक चेतन पाटील, आडगाव येथील कार्यकर्ते मनोहर मोरे होते.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार पाटील सहकार्‍यांसह पारोळा येथे रवाना झाले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !