चिन्या जगताप हत्याकांड : दोन वर्षानंतर फरार आरोपींना अटक


Chinya Jagtap murder : Absconding accused arrested after two years जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहातील चिन्या उर्फ रवींद्र जगताप हत्येप्रकरणातील पसार आण्णा किसन काकड (53, पानेवाडी, मनमाड), अरविंद प्रकाश पाटील (38, रा.चाळीसगाव) यांना तब्बल दोन वर्षांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी गुरूवारी रात्री 10 वाजता अटक केली. दोघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

जबर मारहाणीत कैद्याचा झाला होता मृत्यू
11 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा कारागृहात संशयितांनी केलेल्या जबर मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केला होता. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह चार कर्मचार्‍यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.




कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या 48 तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नव्हते तर 14 महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पेट्रस गायकवाड याचे निलंबन करण्यात आल्यानंतर आता पसार आरोपी आण्णा किसन काकड (53, पानेवाडी, मनमाड), अरविंद प्रकाश पाटील (38, रा.चाळीसगाव) यांना गुरूवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता अटक करण्यात आली . मुख्य संशयित आरोपी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी हे अद्यापही पसार आहेत. तपास पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !