राज्यातील कृषी केंद्र चालकांचा 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान बंद
राज्यव्यापी बंदमध्ये रावेर तालुक्यातील कृषी केंद्र चालक सहभागी होणार : रावेर तहसीलदारांना निवेदन
Abduction of agricultural center operators in the state from November 2 to 4
रावेर : राज्यातील कृषी केंद्र चालक 2 ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान आपापली दुकाने बंद ठेवणार असून या संपात तालुक्यातील चालक सहभागी होणार आहेत. या संदर्भात सोमवारी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तहसील प्रशासनाला निवेदन
रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते बांधवांची बैठक झाली. त्यात 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी कृषी विक्रेत्यांचया बंदमध्ये सहभागी होऊन तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांची दुकाने तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील निवेदन सोमवारी रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले. यासोबत तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल.ए.पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.

नवीन कृषी विधेयकाला विरोध
गत पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विषयक सुधारणांमध्ये नव्या कायद्याचं आवाहन केलं होते. त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली नवीन कृषी विधेयके ज्या विधेयक क्रमांक 40 ते 44 या दरम्यान असलेल्या विधेयकांमध्ये दिलेल्या शिक्षेच्या तरतुदीविषयी व एमपीडीए सारख्या गंभीर गुन्हेगारी वृत्तीचा संदर्भ दिला असल्याने कृषी विक्रेत्यांचा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रोष आहे. त्या अनुषंगाने राज्यातील माफदा संघटनेतर्फे दिनांक 02 नोव्हेंबर ते 04 नोव्हेंबर दरम्यान 70 हजार कृषी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद पुकारला असून रावेर तालुक्यातील सर्व विक्रेतेही संघटनेच्या माध्यमातून आपली दुकाने बंद ठेवणार असल्याने तीन ठिकाणी निवेदन देण्यात आली. यासोबतच तालुक्यातील 160 विक्रेत्यांनी निवेदनावर सह्या देऊन या बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. हा बंद तालुक्याप्रमाणेच राज्यभरात असून या बंदमुळे शेतकर्यांची गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने 1 नोव्हेंबरपर्यंत कृषी विक्रेत्यांनी शेतकर्यांना सेवा दिली जाणार आहे. शेतकर्यांनी त्या पुढील शेती विषयक कामांचं नियोजन करून आधीच कृषी साहित्याची खरेदी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
यांची निवेदन देताना उपस्थिती
यावेळी रावेर तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, सचिव युवराज महाजन, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, एकनाथ पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील गुरुजी, चंद्रकांत अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश महाजन, डॉ.जी.एम.बोंडे, विकास पाटील, श्रीपाद जंगले, स्वप्नील पाटील, प्रकाश चौधरी, चेतन महाजन, योगेश आस्वार यांच्यासह तालुकाभरातून आलेले कृषी विक्रेते उपस्थित होते.









