होय, रावेर लोकसभेची निवडणूक मीच लढवणार ! : आमदार एकनाथराव खडसे
भुसावळ : रावेर लोकसभा निवडणुकीला वर्षभर अवकाश असून त्यापूर्वीच राजकीय पक्षांकडून उमेदवारीवर दावा केला जात आहे. रावेर लोकसभेची जागा सध्या काँग्रेसकडे आहे मात्र यापूर्वीच्या निवडणुकीतील एकवेळचा अपवाद पाहता काँग्रेसला या जागेवर यश मिळाले नसल्याने काँग्रेसकडून ही जागा राष्ट्रवादी खेचण्याच्या तयारीत आहेत. या अनुषंगाने राज्याचे हेवीवेट नेते तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी रावेर लोकसभेसाठी स्वतःच उमेदवार असणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थात आघाडीच्या चर्चेत ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार यानंतरच राजकीय समीकरणांचा अंदाज मांडणे योग्य ठरणार आहे.
रावेर लोकसभेचे शिवधनुष्य खडसे पेलणार !
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सी अलीकडेच जळगाव दौर्यावर आल्यानंतर त्यांनी आमदार खडसे यांना रावेर लोकसभेचा धनुष्यबाण उचलावा, अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाल्यास आमदार खडसे हे लोकसभेचे उमेदवार असतील हेदेखील तितकेच खरे

खडसे म्हणाले ; होय मीच लोकसभेचा उमेदवार
रावेर लोकसभेच्या निवडणुकीत आपणच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. काँग्रेसला यापूर्वीच्या निवडणुकीत मिळालेले मतदान व अपयश पाहता या जागेवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
काँग्रेसचे नऊ निवडणुकीत पानीपत
रावेर लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगला आहे. 1989 साली हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण 10 निवडणुका झाल्या. या 10 पैकी नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. फक्त एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली. काँग्रेसने केवळ 13 महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी आता बदल करावा आणि आम्हाला ही जागा द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.






