राष्ट्रीय नृत्य महोत्सवात भुसावळातील भालेराव कुटुंबीयांचे दुहेरी यश
Double success of Bhalerao family from Bhusawal in National Dance Festival भुसावळ : संस्कार भारती नाट्य केंद्र, आगरा, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व मिल्टन पब्लिक स्कूल, आगरा यांच्यावतीने 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान मिल्टन पब्लिक स्कूल, अवधपुरी, आगरा या ठिकाणी आयोजित अखिल भारतीय नृत्य महोत्सवात भुसावळ येथील नुपूर कथ्थक डान्स अॅकेडमीच्या नृत्य शिक्षिका चारू भालेराव यांना शिक्षा मनिशी डॉ.साधना शर्मा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान राष्ट्रीय ख्याती प्राप्त नृत्य शिक्षिकांना देण्यात येतो. पुरस्काराच्या स्वरूपात उपरण, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
भालेराव परीवारावर शुभेच्छांचा वर्षाव
याच सोबत 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान वृंदावन येथे श्री गंगा लोककल्याण सेवा संस्थानच्या सांस्कृतिक शाखेच्या वतीने वृंदावन शोध संस्थानच्या नाट्यगृहात ‘बान्सुरी रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी आपले नृत्य सादर केले. त्यांना शाल, स्मृतीचिन्ह व बांकेबिहारीची प्रतिकृती देऊन गौरवण्यात आले. याच स्पर्धेत शास्त्रीय नृत्यात लहान गटात नुपूर भालेराव ला तृतीय क्रमांकाचे पारीतोषिक प्राप्त झाले. यात स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे भालेराव कुटुंबीयांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







