भुसावळातील प्रशासक-मुख्याधिकार्यांचे नियमाने काम : ज्येष्ठ नेते आमदार खडसेंचा निविदा मॅनेजचा आरोप तथ्यहिन !
भाजपा पदाधिकार्यांकडून अधिकार्यांची पाठराखण ः निविदेतील आमदारांच्या हस्तक्षेपाचे भाजपाने केले खंडण
Administrator-CEO in Bhusawla work according to rules : Senior leader MLA Khadse’s allegation of tender management is baseless! भुसावळ : भुसावळ पालिकेने मालमत्ता करात केलेली अवाजवी वाढ व दलितेतर वस्ती विकास योजनेतून होणार्या आठ कोटींच्या निविदा प्रक्रिया मॅनेज झाल्याचा आरोप ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी थेट जिल्हाधिकार्यांकडे गुरुवारच्या बैठकीत केल्यानंतर त्याचे पडसाद दुसर्या दिवशी शुक्रवारी शहरात उमटले. भाजपा पदाधिकार्यांनी भुसावळचे प्रशासक जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची पाठराखण करीत संबंधित अधिकारी चांगले काम करीत असल्याचा दाखला दिला शिवाय अधिकार्यांची शहरातून बदली झाल्यास शहराच्या विकासावर त्यामुळे परीणाम होवून कुणी अधिकारी शहरात येणार नाही, असा सूरही भाजपेयींच्या पत्रकार परीषदेत उमटला. आमदार संजय सावकारे यांच्यावर आमदार खडसे यांनी निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेपाचा व निविदा प्रक्रिया मॅनेज असल्याचा आरोपही सर्व भाजपा पदाधिकार्यांनी यावेळी फेटाळून लावला. आमदार संजय सावकारे यांच्या सुरभी नगरातील कार्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परीषद झाली.
पालिका मुख्याधिकार्यांचे नियमाने काम
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, आमदार खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, आम्हाला आजही त्यांच्याविषयी आदर आहे. त्यांनी खरेतर पालिकेत यायला नको होते. कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती पुरवली आहे. निविदा स्वीकारणे अथवा रद्द करण्याचा अधिकार मुख्याधिकार्यांना आहे. प्रांताधिकारी व मुख्याधिकार्यांबाबत तक्रार करून त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली मात्र अधिकार्यांची बदली झाल्यास त्याचा परीणाम शहराच्या विकासावर होईल व कुणीही शहरात येणार नाही. प्रत्येक कामासाठी निविदा आल्या आहेत त्यामुळे स्पर्धा निश्चितच झाली असून निविदा मॅनेज झाल्याचा आरोप हास्यास्पद आहे, असे लोणारी म्हणाले.

दीपक धांडे यांचा होमवर्क कच्चा
युवराज लोणारी म्हणाले की, दीपक धांडे यांचा होमवर्क कच्चा आहे त्यामुळे निविदा प्रक्रियेवर आरोप करण्याआधी त्यांनी होमवर्क चांगला करावा. केवळ चमकोगिरी करण्यासाठी स्टेटमेंट देवू नये. पालिकेच्या निविदा प्रक्रियेत अटी शर्ती यासाठी टाकण्यात आल्या आहेत की, यापूर्वी काहींनी केवळ निविदा भरल्यानंतर वर्क ऑर्डर मिळूनही काम केले नाही त्यामुळे शहराच्या विकासावर परीणाम झाल्यानेच पालिकेने निविदा प्रक्रियेत अटी व शर्ती घातल्याचे लोणारी म्हणाले. शहर विकासाची तुम्हाला खरोखर तळमळ असेल तर अधिकार्यांवर दडपण आणू नये, असा टोला त्यांनी विरोधकाांना लगावला. शहरातील कुठल्याही मक्तेदाराने वा सर्वसामान्य नागरीकांनी आरोप केलेले नाहीत त्यामुळे सर्व झालेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत.
तर मुद्रा लोण चोरट्यांचा करा निषेध
भुसावळातील अतिक्रमण निघण्यास आमदार जवाबदार आहेत, असा आरोप उल्हास पगारे यांनी केला मात्र स्वतः आमदारांनी मोहिम थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर दिवाळीत अतिक्रमण निघाले नाही, असे लोणारी म्हणाले. शहरात मोहिम सुरू असताना केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मी उपस्थित होतो त्यामुळे तुम्ही कुठे होतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहरातील मुद्रा लोण चोरट्यांचाही निषेध करण्याचे आवाहन त्यांनी उल्हास पगारे यांना करीत लवकरच मुद्रा लोण चोरट्यांवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.
निविदा प्रक्रिया मॅनेजचा आरोप हास्यास्पद : सी.ए.प्रा.दिनेश राठी
सी.ए. व माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी म्हणाले की, निविदा प्रक्रिेयेत न्यायालयाचा स्टे दिला नसल्याने खरे तर ही विरोधकांना चपराक आहे. दिड कोटींवर निविदा रक्कम असल्यास आरएमसी स्वतःचा हवा ही बाब न्यायालयाने निदर्शनास आणून दिली आहे. मुख्याधिकार्यांनी काढलेल्या निविदेत उलट आरएमसी प्लँट स्वतःच्या मालकिचा नसल्यास भाडे तत्वावर वा करार असल्यास तरी चालेल, अशी अट दिली आहे त्यामुळे मुख्याधिकारी हे नियमाने काम करीत असून निविदा मॅनेज असल्याचा आरोप हास्यास्पद आहे शिवाय मालमत्ता पुर्नमूल्यांकनाबाबतचाही प्रश्न सुटल्याने जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीत अर्थ नाही.
तर मानहानीचा दावा दाखल करणार : परीक्षीत बर्हाटे
भुसावळ पालिकेच्या निविदा प्रक्रियेत आमदार सावकारे यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे मात्र हा आरोप तथ्यहिन आहे. या आरोपाचे आम्ही खंडण करतो, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे म्हणाले. विरोधकांनी आरोप मागे घेवून माफी मागावी अन्यथा आम्ही मानहानीचा दावा दाखल करू.
आमदारांवर आरोप केल्याने मिळते प्रसिद्धी : सतीश सपकाळे
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे म्हणाले की, आमदारांवर आरोप केल्याने मिडीयातून प्रसिद्धी मिळत असल्याने विरोधक आरोप करतात. आरोप करणार्या लोकांनी मागील काळात आमदार सावकारे यांच्या दारी चकरा मारून पदरात अनेक कामे पाडून घेतली, असा दावा सतीश सपकाळे यांनी यावेळी केला. निविदा प्रक्रिया पारदर्शक असून पालिका मुख्याधिकारी नियमाने काम करीत असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ नेत्यांना पुरवली चुकीची माहिती
माजी नगरसेवक पिंटू ठाकूर म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून पालिकेत मक्तेदारांच्या वर्क ऑर्डर पडून आहेत मात्र त्या कुणीही घ्यायला तयार नाही. ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पुरवली आहे,
शहराच्या विकासासाठी आम्ही त्यांची भेट घेवू व सत्य परीस्थिती निदर्शनास आणून देवू. शहर विकासासाठी लोकनेत्यांनी निधी द्यावा, विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ठाकूर म्हणाले.
अभियंता आमदारांकडून शहराचा विकास : राजेंद्र आवटे
माजी नगरसेवक राजेंद्र आवटे म्हणाले की, भुसावळचे आमदार उच्चशिक्षीत व अभियंता आहेत. आमदार खडसेंनी पालिकेत आमदारांवर केलेल्या आरोपानंतर त्यांचे नाव खराब करण्याची बाब शहरवासीयांनादेखील पटलेली नाही. आमदार संजय सावकारे यांच्याकडून शहरातील प्रत्येक प्रभागाला निधी दिली जात असून चौफेर शहराचा विकास सुरू असल्याचे आवटे म्हणाले.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, बापू महाजन, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, निकी बत्रा, पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र नाटकर, दिनेश नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांची उपस्थिती होती.






