अहमदनगरमधील एक कोटींचे लाच प्रकरण : लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाडची जामिनावर सुटका
धुळ्यातील लाचखोर अभियंता गणेश वाघ पसारच ! ः राज्यभरात कसून शोध
One crore bribe case in Ahmednagar : Bribery assistant engineer Amit Gaikwad in custody नाशिक : एक कोटींच्या लाच प्रकरणी अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड यास नाशिक एसीबीने शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अटक केली होती. लाच प्रकरणात अहमदनगरचे तत्कालीन अभियंता व सध्या धुळे कार्यालयात कार्यरत कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघ यांना सापळ्याची कुणकुण लागताच ते कुटूंबासह पसार झाले आहेत. सहाय्यक अभियंता गायकवाड यांना सुरूवातीला अहमदनगर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी कोठडीत मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर जामीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने पन्नास हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसीबीची सर्वात मोठी कारवाई
अहमदनगर एमआयडीसी येथील तत्कालीन उपअभियंता व सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ व अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगरच ठेकेदाराचे पाईप लाईनच्या 31 कोटींच्या कामाचे थकीत 2.66 कोटींचे बिल काढण्यासाठी व बिलावर मागील तारखेच्या सह्या करण्यासाठी कंत्राटदाराकडे एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शनिवारी दुपारी चार वाजता अहमदनगर-छत्रपती संभाजी नगर बायपासवरील शेंडी बायपासजवळ संशयित सहाय्यक अभियंता गायकवाड याने वाहनातच एक कोटींची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर धुळ्यातील अभियंता गणेश वाघ हा कारवाईची कुणकुण लागताच कुटुंबासह पसार झाला.


गणेश वाघचा राज्यात शोध
आरोपी गणेश वाघच्या शोधासाठी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, मुंबई व पुणे येथे पथके पाठवण्यात आली आहेत. संशयित राज्याबाहेर किंवा देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी विमानतळ प्राधिकरणालाही माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.