येवती सरपंचाविरोधात बोदवड तहसीलवर मोर्चा
येवती-रेवती ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील यांच्या कारभाराविरोधात ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
बोदवड : तालुक्यातील येवती-रेवती ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय बाळकृष्ण पाटील यांच्या कारभाराविरोधात शुक्रवारी बोदवड तहसील कार्यालयावर येवती व रेवती येथील अनेक महिलांनी व ग्रामस्थांनी मोर्चा काढला तसेच येवती सरपंच हटाव,गाव बचाव अशा घोषणाी दिल्य. तत्पूर्वी ग्रामस्थांकडून येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
गावठाण जागा परस्पर विकल्याचा आरोप
सरपंच संजय पाटील यांनी रेवती येथील लोढू आनंदा सपकाळ (75) हे वयोवृद्ध त्यांच्या कुटूंबासह अनेक वर्षांपासून या गावठाण जागेवर राहत असताना सरपंच संजय पाटील यांनी सरपंच पदाचा गैरफायदा घेत येथील गावठाण जागा परस्पर येथीलच महिलेला विकली त्यानंतर संबंधित महिलेने ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला असता येथील वृध्द व त्याच्या कुटूंबाने या सर्व प्रकराला विरोध केला असता येथील महिला नज्जोबी शे.आरीफ व तीच्या कुटूंबासह येथील वृद्ध लोढू आनंदा सपकाळ यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने या महिलेविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेनंतर महिलेकडून स्वतः विष प्राशन केल्याने या महिलेवर उपचार सुरू आहे.

सरपंचांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तक्रार
सरपंच संजय पाटील यांनी बेकायदेशीररीत्या पैसे घेऊन व ग्रामसेवक यांच्या बोगस सह्या करून गावातील अनेक गावाठाणच्या जागांची परस्पर विक्री केली असून असे प्रकार सरपंचांनी अनेकदा केलेले आहेत. सरपंच गावाच्या विरोधी असून त्यांना सरपंच पदावरून हटवावे, अशी मागणी येवती व रेवती ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी तहसीलदार रवींद्र जोगी तसेच बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कठोर कारवाईची मागणी
येवती सरपंच यांनी आजपर्यंत बेकायदेशीररीत्या अनेक गावठाण जागांची विक्री केली असुन याची गटविकासाधिकारी यांनी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी केली.
आरोपी बिनबुडाचे -सरपंच
आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असुन संबंधित व्यक्तीने गावठाण जागा परस्पर विकल्याने त्याची चौकशी करावी, असे सरपंच संजय पाटील म्हणाले.


