राज्यासह केंद्रातील तपास यंत्रणा स्वायत्त : चुकीचे केले नसल्यास घाबरण्याचे कारण नाही : अजित पवार
Investigative system in central as well as state autonomous : No reason to panic if not done wrong : Ajit Pawar पिंपरी : राज्यासह केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत, त्यांना कारवाईचे अधिकार आहेत त्यामुळे कुणी चुकीचे केले नसल्यास घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेले होते हे तपासा असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला होता व याबाबत अजित पवारांना छेडले असता त्यांनी वरील विधान केले.
रोहित इतका मोठा नेता नाही
पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.


राज ठाकरे काहीही बोलतात
हे सहकार चळवळीच नाही तर सहारा चळवळीचे सरकार आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्याबाबत अजित पवारांना छेडले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी किती सहकारी संस्था उभारल्या हे त्यांनी सांगावे. मी आत्तापर्यंत 32 वर्षात सहकारी संस्थांच प्रतिनिधित्व करतोय. सहकारी बँकांमध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी बँका रसातळाला जातात. त्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे नुकसान होते. त्यामुळे सहकार चळवळ चालवणे इतके सोपे नाही. राज ठाकरे काहीही बोलतात, अशी टीका पवार यांनी केली.





