यावल नगरपालिकेचा करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प मंजूर
नागरीकांना दिलासा : मुबलक पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत करवाढ न करण्याची अतुल पाटील यांची मागणी
यावल : यावल नगरपरीषदेचा कुठलीही करवाढ न केलेला शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारच्या विशेष सभेत प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा
यावल नगरपरीषदेचे विशेष सभा प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रमाकांत मोरे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण विवेचन करून नगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व्यापारी संकुल तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून नगरपालिकेसमोर बांधण्यात आलेले व्यापारी दुकाने लिलाव करण्याबाबत नगरपालिका उदासीन असून त्यावर आक्षेप घेऊन 31 मार्चपर्यंत लिलाव प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. जोपर्यंत यावल शहराला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी करांमध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना अद्यापपर्यंत उर्वरीत रकमेचा हप्ता मिळाला नसल्याने नागरीकांची नाराजी असल्याचे निदर्शनास आणून दिले त्याचप्रमाणे शहर विकास आराखड्यातील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेस विकसीत करण्यात येऊन व नगरपरीषद संचलित सानेगुरुजी विद्यालयातील नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली व सभागृहाने ती सर्वानुमते मंजूर केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख तसेच नगरसेवक मुकेश येवले, अभिमन्यु चौधरी, देवयानी महाजन, रुक्माबाई भालेराव, दीपक बेहेडे व इतर नगरसेवक उपस्थित होते.



