सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई : न्हावी गावातून 60 हजारांचा गुटखा जप्त
Action of the team of Assistant Superintendent of Police : Gutkha worth 60 thousand seized from Nhavi village फैजपूर : फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जवळच असलेल्या न्हावी गावातील किराणा दुकानातून 60 हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. याप्रकरणी संशयित सुनील अशोक माखीजा (41, न्हावी, ता.यावल) याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवार, 27 रोजी रात्री पावणेअकरा वाजता करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या पथकाला न्हावी येथील किराणा दुकानात साठवलेल्या गुटख्याच्या साठ्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करीत विमल पानमसाला, करमचंद पानमसाला, राजश्री पानमसाला, राजनिवास सुगंधी पानमसाल्याचा एकूण 59 हजार 806 रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कॉन्स्टेबल अल्ताफ अली हसन अली यांच्या फिर्यादीवरून सुनील माखीजा (41, न्हावी) विरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

