यावल शहरात दोन दुचाकींमध्ये अपघात : तिघे जखमी


Accident between two bikes in Yaval City : Three injured यावल  : यावल-भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबा दर्गाजवळ गुरूवारी रात्री दोन दुचाकीची समोरासमोर धडक होवून तिघे जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता आणण्यात आले. रुग्णालयात तिघांवर प्रथमोपचार करीत जखमींपैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

एकाची प्रकृती गंभीर
यावल-भुसावळ रस्त्यावर पाटचारीच्या पुढे घोडे पीरबाबा दर्गाजवळ गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास यावल कडून भुसावळकडे दुचाकी (क्रमांक एम. एच.19 डी.झेड. 8822) घेऊन शेख इब्राहिम शेख इस्माईल (25) व याकुब खान इब्राहिम खान (30, दोघे रा.वरणगाव) हे दोघे जात असताना भुसावळकडून यावलकडे दुचाकीव्दारे रवींद्र भीमसिंग पाटील (52, रा.नावरे, ता.यावल) हे येत होते. दोघा दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तिघांना दुखापत झाली. जखमी अवस्थेत नागरीकांच्या मदतीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.



यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, बापू महाजन यांनी या तिघांवर प्रथामोउपचार केले. रवींद्र पाटील यांच्या हाताला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच यावलचे सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार निलेश वाघ व पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी जखमीची जाब जबाब घेतले असून रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात अपघाताच्या संदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !