चाळीसगावचे आमदार दमदार : दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी 133 कोटींचे भरघोस अनुदान मंजूर


चाळीसगाव : खरीप हंगाम सन 2023 – 24 महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाला असल्याने दुष्काळी तालुक्यांसाठी असणार्‍या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी लागू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमा धारक शेतकर्‍यांना 25 टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणार्‍या मदतीची शेतकर्‍यांना अपेक्षा होती. यासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्याला यश मिळाले असून नुकताच राज्य शासनाने या 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकर्‍यांना जवळपास 133 कोटी 19 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे.

133 कोटींची सर्वात मोठी मदत
महिन्याभराच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे शासन निर्देश असल्याने चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार शेतकर्‍यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्याला आतापर्यंत प्राप्त दुष्काळी अनुदानांमध्ये 133 कोटी ही आजवरची सर्वात मोठी मदत मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे..




मदतीची मर्यादा आता 2 हेक्टर वरून 3 हेक्टर वर… अनुदान रक्कम देखील वाढवली…
राज्य शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत कुठलीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकर्‍यांना 2 हेक्टर पर्यत मर्यादेत मदत दिली जात होती, त्यामुळे 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान होत होते. मात्र आता राज्य शासनाने आपले धोरण बदलले असून मदतीची मर्यादा 2 हेक्टर वरून 3 हेक्टर केली आहे आहे तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ मिळणार आहे. त्यात बहुवार्षिक पिके – 22500/- प्रति हेक्टर, बागायत – 17500/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – 8500/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकर्‍यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.

भाजपा महायुती सरकारचे आभार : आमदार मंगेश चव्हाण
गेल्या आठवड्यातच सन 2021 मध्ये महापुरात नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना 6 कोटी निधी मिळाला होता. त्यातच आता खरीप हंगामातील दुष्काळग्रस्तांना 133 कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या 15 वर्षात अनेकदा दुष्काळ, अवकाळी पाऊस संकटे आली मात्र चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी 100 कोटींच्या वर मदत मिळाली आहे. महिन्या भराच्या आत थेट बँक खात्यात हे अनुदान जमा होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार असून प्रत्येक संकटात शेतकर्‍यांच्या पाठीशी भाजपा महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकरम शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मदत केली जाणार आहे. सदर भरघोस मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !