यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात वसतिगृहातील कंत्राटी कामावरून दोघांनी घातला धिंगाणा


यावल (शुक्रवार, 24 जुलै 2026) : यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शुक्रवार, 24 रोजी दुपारी दोघांनी धिंगाणा घातला. कंत्राटी काम मिळत नसल्याच्या रागातुन प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी यांची कॉलर पकडून शिविगाळ करीत शासकिय कामात अडथळा निर्माण करीत कार्यालयात कर्मचार्‍यांना उद्देशून अश्लील शिव्या देण्यात आल्या.  या प्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण
यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी दुपारी साहील उर्फ संजय हमीद तडवी व रोहन साहील तडवी (दोघे रा. फैजपूर, ता. यावल) हे आले व दोघांनी प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी यांना सांगितले की, तुझ्यामुळे मला शासकीय मुलांच्या वसतिगृहातील भोजन, भंगार व साफसफाईच्या कंत्राट मिळत नाहीये, असे सांगत वाद घालायला सुरवात केली. त्यांची जावेद तडवी यांनी समजुत काढली मात्र साहिल तडवी यांनी त्यांना शिविगाळ करीत थेट त्यांची कॉलर पकडून मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करून त्यांनी धमकी देत शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला.

अधिकार्‍यांची धाव
वादाची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी पोलीस ठाण्यात येवून कर्मचार्‍यांची समजुत काढली. या प्रकरणी यावल पोलिसात जावेद तडवी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

आरोपींना अटक करण्याची मागणी
यावल पोलीस ठाण्यात तडवी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबधीतांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शासन मान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, आदिवासी एकता मंच आदिवासी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !