भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी
भुसावळ : चोपडा तालुक्यातील चहार्डी परीसरातील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केली. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून स्थानिक शेतकर्यांना धीर देत अवकाळीग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी यावेळी केले.
अनेक शेतकर्यांच नुकसान
गारपीट व अवकाळी पावसामुळे चहार्डी परीसरातील हातेड रस्त्यावरील अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कांदा, दादर, मका, गहू, टमाटर, लिंबू या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना बांधा वरूनच जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी तहसीलदार बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तत्काळ पंचनामा करण्याचे सांगितले.



यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे गोविंद सैंदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, प्रदीप पाटील, धनंजय पाटील, गजेंद्र सोनवणे, दीपक बाविस्कर, जीवन पाटील, रोहिदास पारधी, कांतीलाल पाटील, संदीप पाटील, हनुमंत महाजन, सोनू भादले, प्रकाश पाटील, वेडू दोधु पाटील, वैभव पाटील, पिंटू पाटील यांच्या सह स्थानिक शेतकरी बांधव तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





