भुसावळात मिरवणुकीत वाद : चौघांवर प्राणघातक हल्ला


भुसावळातील जळगाव नाक्यासमोरील घटना : एक जण गंभीर : मुकेश पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : शिवजयंती मिरवणुकीत कडू प्लॉट भागातील लहान मुलांचा दगडी पुलाजवळ शाब्दीक वाद झाल्यानंतर चौघांवर तलवारीसह लोखंडी रॉड व प्लॉस्टीक पाईपासह लाकडी दांड्यांने चौघांवर हल्ला झाल्याची घटना जळगाव नाक्यावरील पिठाच्या गिरणीसमोर बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाच जणांविरूद्ध शहर पोलिसात दंगल व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रात्री घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वाढत जाणारी गुन्हेगारी आता थोपवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेने पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चौघांवर प्राणघातक हल्ला
तक्रारदार मुकेश राखुंडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवजयंती मिरवणुकीत दगडी पुलाजवळ कडू प्लॉट भागातील लहान मुलांचा शाब्दीक वाद झाला होता व त्यानंतर मिरवणूक बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील शिवाजी पुतळ्याकडे गेल्यानंतर राखुंडे यांच्यासह जितू भालेराव, भरत महाजन, पंकज बाविस्कर, रोहित सोनवणे हे टेक्नीकल हायस्कूलकडे जात असताना जळगाव नाक्याजवळच्या पीठाच्या गिरणीजवळ संशयीत आरोपी हातात तलवार, लोखंडी रॉड व अन्य साहित्यासह उभे होते. आरोपी मुकेश पाटील याने आपल्यासह जितू भालेराव यास जातीवाचक शिवीगाळ करून यांचे मिरवणुकीत काय काम असल्याचे सांगून यांना जास्त झाल्याने त्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे सांगत तलवारीने आपल्या डोक्यावर हल्ला चढवला तसेच आरोपी अक्षय पाटीलने लोखंडी रॉड डोक्यात मारला तसेच अन्य आरोपींनी लाकडी दांडा, प्लॉस्टीक पाईपासह लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मुकेश धर्मा राखुंडे (मारोती नगर, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मुकेश पाटील, अक्षय पाटील, हर्षल उर्फ शिवाजी, भामरे, सिमेंट वाल्याचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध भादंवि 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 504 तसेच जमावबंदी कायद्यांचे उल्लंघण व अ‍ॅट्रासिटी कायद्याचे उल्लंघण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !