बोदवडला अवैध गौण खनिज वाहतूक : प्रांतांनी सुनावला पावणेपाच लाख दंड
बोदवड : अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्या दोन डंपरवर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी गुरुवारी कारवाई करीत एकूण चार लाख 87 हजार रुपये दंड सुनावल्याने खळबळ उडाली आहे. या वर्षातीही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रांताधिकारी सुलाने गुरुवारी जलचक्र बुद्रूक येथे दगडांच्या खाणीची पाहणी करण्यासाठी जात असताना बोदवड-जामनेर रस्त्यावर असलेल्या शासकीय गोदामाजवळ, दोन डंपर विनापरवानगी डबर वाहतूक करताना आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
प्रांतांच्या कारवाईने उडाली खळबळ
जलचक्र येथील विलास लक्ष्मण पाटील यांचे डंपर (क्रमांक एम.एच.19-झेड.3098) व बोदवड येथील हरीओम शालिग्राम जैस्वाल यांचे डंपर (क्रमांक एम.एच.19 झेड.4098) या दोन्ही डंपर मधून विनापरवानगी प्रत्येकी पाच ब्रास डबर वाहतूक केली जात असताना प्रांताधिकार्यांनी कारवाई करीत हे डंपर बोदवड पोलिसांच्या ताब्यात सोपवले. प्रसंगी तहसीलदार रवींद्र जोगी, नायब तहसीलदार दीपक कुसकर, जी.एस.़डहाके, बोदवड तलाठी नीरज पाटील, शेलवड तलाठी मंगेश पारीसे यांनी ही कारवाई केली.



