चाळीसगावच्या नायब तहसीलदारांची जामिनावर सुटका
जळगाव : न्यायालयीन तारखांना सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी चाळीसगावचे नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध न्यायालयाने एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केल्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी देवेंद्र सुरेश भालेराव (52, सौरभ टेंट हाऊसजवळ, चंद्रलोक अपार्टमेंट जवळ, जळगाव) यांना अटक केली होती. बुधवारी न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
दोन वेळा समन्स तरीही न्यायालयात टाळली हजेरी
2016 मध्ये भालेराव हे जळगाव येथे कर्तव्यावर असताना जळगाव एसीबीने एका लिपिकावर सापळा यशस्वी केला होता व नंतर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्रारदाराने भालेराव यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याची साक्ष न्यायालयात नोंदवली होती शिवाय न्यायालयाने कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर एसीबीने भालेराव यांनाही या आरोपी केले होते. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुरनं.3016/2016 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर जळगाव न्यायालयात खटला क्रमांक 20/2016 अन्वये खटला सुरू असताना भालेराव यांच्याविरुद्ध दोन वेळा समन्स बजावूनही ते न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले होते. मंगळवारी सायंकाळी भालेराव यांच्यावर पाळत ठेवण्यात आली व ते दुचाकीने घराबाहेर पडल्यानंतर ख्वॉजामिया दर्ग्याजवळील पेट्रोल पंपापर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, नासीर देशमुख आदींनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपीला अटक केली तर बुधवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.



