जळगावात मध्यरात्री सौरभ ज्वेलर्सवर धाडसी दरोडा : 44 लाखांचा मुद्देमाल लांबवला
शनीपेठ हद्दीतील घटना : सीसीटीव्हीत सहा दरोडेखोर कैद : चाकू दाखवून केली लूट
A jeweler’s shop was broken into in the middle of the night in Jalgaon : goods worth 44 lakhs were looted जळगाव : जळगावच्या सराफ बाजारातील भवानी माता मंदिराजवळील सौरभ ज्वेलर्स या दुकानात सोमवार, 20 मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर सुमारे 40 लाखांचे सोने लूटले. पहाटेच्या सुमारास पडलेल्या धाडसी दरोड्याने जिल्ह्यातील सराफा बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.
चाकूच्या धाकावर अवघ्या काही क्षणात जबरी लूट
जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नामक दुकान आहे. सोमवार, 20 मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता तीन दुचाकींवर सहा दरोडेखोर तोंडाला रूमाल बांधून दुकानाच्या मागील बाजूने आले. दरोडेखोरांनी मुख्य चॅनल गेटचे मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाच्या छोट्याशा खिडकीतून आत प्रवेश केला. त्या दुकानात दोघे झोपलेले असताना सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. दरडोखोरांनी पुन्हा लोखंडी दरवाजा कटरने कापत आत प्रवेश करत जवळपास 400 ग्रॅम वजनाचे सोने लूटले. याचवेळी पोलिसांच्या गस्तीवरील वाहनाचा आवाज आल्यानंतर दरोडेखोरांनी आहे तो मुद्देमाल बॅगेत टाकून पळ काढला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
सराफा दुकानात पडलेल्या धाडसी दरोड्यानंतर कामगारांनी दुकान मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा पडल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानाच्या शो केसमधील सोन्या-चांदीचे दागिणे मिळून एकूण 44 लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समजते.
400 ग्रॅम सोन्याचे दागिणे लांबवले
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असलेतरी बाहेरील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात दुचाकीस्वार सहा दरोडेखोर कैद झाले आहेत. 44 लाखांचे सुमारे 400 ग्रॅम वजनाचे सोने लुटून नेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह एपीआय विठ्ठल पाटील व वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.