यावल-भुसावळ रस्त्यावर करण्यात आलेले काँक्रिटीकरण ठरतेय डोकेदुखी
डांबरी रोड व कॉक्रीट रोडाचा उंच उंबरठा अपघातास कारणीभूत
यावल : यावल ते भुसावळ रस्त्यात राजोरा फाट्यापासून ते अंजाळे उपपाटचारीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आला मात्र डांबरी रोड आणी काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यात उंच उंबरठ्यासारखे अंतर निर्माण झाले आहे व या मार्गावरून मार्गस्त होणार्या नवीन व्यक्तीच्या निर्दशनास हा गॅप येत नाही व अपघात घडत आहे. दोन्ही रस्त्याची समांतर उंची करण्याची मागणी वाहन धारकांनी केली आहे.
दररोज वाहनांचे होतेय नुकसान
राजोरा फाट्यापासून ते अंजाळे पाटबंधारे विभागाच्या उपचारीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पार पडले व संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण करून डांबरी रस्ता ते सिमेंट रस्ता यामध्ये पडलेला गॅप तात्पुरत्या खडीने बुजवून त्यावर खूप कमी प्रमाणात डांबर टाकले व काही दिवसातच हे डांबर निघून गेल्यामुळे खडी विस्कळीत झाली व एक भला मोठा गॅप मुख्य डांबरी रस्ता व काँक्रिट रस्त्यात पडला. उंच उंबरठ्यासारखा हा गॅप असून या मार्गावरून नवीन वाहन धारकांच्या निर्दशनास हा गॅप येत नाही व वाहने येथे रस्त्यावर आदळून अपघात होतात. राजोरा फाट्याजवळ बजरंग धाब्याजवळ हा गॅप तयार झालेला असून अचानक भरधाव येणार्या वाहन चालकांच्या लक्षात न येता थेट अपघात घडत आहे. व यामध्ये वाहनाचे नुकसानीसह वाहनधारक किरकोळ जखमी झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी लवकरात लवकर संबंधित ठिकाणी भराव टाकून रस्त्याची लेव्हल करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.





