चाळीसगाव तालुक्यातील दरोड्याची उकल : 16 लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात


Chalisgaon taluk robbery solved : Three in the net with 16 lakhs worth of goods जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे हद्दीतील दहिवद गावात पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. एका अल्पवयीनासह तिघांना अटक करण्यात आली असून संशयीतांकडून 16 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी सायंकाळी दिली.

दहिवद येथे मध्यरात्री पडला होता दरोडा
रविवार, 12 मे 2024 रोजी रात्री अडीच ते तिन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवद येथे घनश्याम धर्मराज पाटील या तरुणाच्या राहत्या घराच्या मागील खिडकीचे गज कापून सात अनोळखी इसमांनी प्रवेश केला होता. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत लोखंडी व लाकडी दांडक्याने घनश्याम पाटील यास मारहाणीसह दरोडा टाकून 16 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला होता. या मुद्देमालात सोन्याचे दागिने व मोबाईल आदींचा समावेश होता.

मध्यप्रदेशातून दोघांना अटक
मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल या गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. मध्य प्रदेशात अति दुर्गम भागात जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका अल्पवयीनासह कालूसिंग हुजारीया बारेला (52, भामपुरा, ता.सेंधवा, जिल्हा बडवाणी) आणि सुनील मुरीलाल बारेला (21, बुलवानीया, ता.सेंधवा, जिल्हा बडवाणी) या दोघांना अटक करण्यात आली.

सोन्यासह गुन्ह्यातील वाहन जप्त
आरोपींकडून 10 लाख 92 हजार रुपये किंमतीचे 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन, 20 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल, तीन हजार रुपये किंमतीचा वापरता मोबाईल, एक करवत असा सुमारे 16 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, मनोहर शिंदे (नेमणूक नाशिक गुन्हे शाखा युनिट 2), हवालदार गोकुळ सोनवणे, दीपक पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, निलेश पाटील, विनय पाटील (नेमणूक चाळीसगाव शहर पोस्टे), गोरख चकोर (नेमणूक मेहुणबारे पोस्टे), ईश्वर पाटील, गौरव पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह त्यांचे सहकारी निलेश लोहार व पथक करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !