वसई हादरले : प्रेयसीची भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पाना मारून केली हत्या
Vasai shook : Girlfriend killed by hitting her head with an iron blade on Bhar road वसई प्रेयसीशी ब्रेक झाल्यानंतर ती अन्य कुणाशी बोलते या संशयाने मनात घर केल्यानंतर प्रियकराने भर रस्त्यात प्रियसीच्या डोक्यात लोखंडी पान्याने तब्बल 15 वार केले व या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. आरती यादव (22) असे मयताचे तर रोहित यादव (29) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही घटना वसईतील गावराई पाडा भागात मंगळवारी सकाळी घडली. हत्या होत असताना नागरिक व्हिडिओ बनवत राहिले मात्र प्रियकराला रोखण्याचे धाडस कुणीही दाखवले नाही.
ब्रेकअपनंतर केली हत्या
वसई पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपासून प्रेमात असलेल्या रोहित व आरती यांचा अलीकडेच ब्रेकअप झाला होता. मात्र ती इतर मुलांशी बोलते असा रोहितला संशय होता. यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरती नेहमीप्रमाणे खासगी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाली होती. त्याच वेळी नालासोपार्यात राहणारा रोहितही तिथे आला होता. आरतीला अडवून त्याने जाब विचारला. पण दाद न देता आरती पुढे निघाली. त्याच वेळी त्याने पाठीमागून आरतीच्या डोक्यात लोखंडी पान्याने वार केला, त्यामुळे ती रस्त्यावर पडली. नंतर तिला क्षणभरही बचावाची संधी न देता रोहित तिच्यावर सातत्याने घाव घालत होता. सुमारे 24 सेकंदांत त्याने 15 गंभीर घाव घालत तिला ठार केले. नंतर ‘तू अशी का वागलीस?’ असे जोरजोराने ओरडत तो मृतदेहाशेजारी बराच वेळ उभा होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आरोपीला अटक केली.

