भरधाव ट्रकच्या धडकेने चिंचगव्हाणचे दोन्ही मित्र ठार


चाळीसगाव : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावातील दोन मित्र जागीच ठार झाले. हा अपघात बुधवार, 19 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुरूवारी 20 जून रोजी सकाळी 10 वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विलास छगन बागूल (वय 44) व अंकुश काशिनाथ गायकवाड (35, चिंचगव्हाण) अशी मयत दोन्ही मित्रांची नावे आहेत

ट्रकच्या धडकेने दोघे ठार
विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे दोन्ही जिगरी मित्र चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. बुधवार, 19 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघे दुचाकी क्रमांक (एम.एच.15 डी.टी.5788 ) ने सांगवी ता. चाळीसगाव येथे कामाच्या निमित्ताने जात असताना चाळीसगाव तालुक्यातील भोरस शिवारातील महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एच.आर.62 ए.1083) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला.

याप्रकरणी गुरुवार, 20 जून रोजी सकाळी 10 वाजता मयत विलास बागुल यांचे चुलत भाऊ मुरलीधर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार हवालदार विजय शिंदे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !