जामनेर पोलीस ठाण्याबाहेरील दंगल : 14 आरोपींना अटक
विशेष महानिरीक्षकांची भेट तुफान दगडफेकीत पोलीस निरीक्षकांसह 18 कर्मचारी जखमी ः शहरात तणावपूर्ण शांतता
Riot outside Jamner Police Station : 14 accused arrested जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला अटक करून जामनेर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी करत संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. ही घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी जमावाने टायरची यावेळी जाळपोळ करीत तुफान दगडफेक केल्याने जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदेंसह 18 कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी हल्ला करणार्या एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर आरोपी सुभाष उमाजी भिल्ल (35) यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर जळगावी हलवण्यात आले. दरम्यान, शहरातील तणावाची स्थिती पाहता शुक्रवारी शहरातून पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढला.
आरोपीला ताब्यात देण्यासाठी पोलीस ठाण्यावर हल्ला
जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी सुभाष भिल्ल यास भुसावळ येथून अटक करून आणल्यानंतर जामनेरात आणण्यात आले व आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या दोन फैरी झाडण्यात आल्याची चर्चा आहे तसेच छर्र्याच्या बंदुकीतून तब्बल 34 वेळा फायर करण्यात आला मात्र तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली तसेच पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली व अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

निरीक्षकासह 18 पोलीस कर्मचारी जखमी
दगडफेकमुळे ठिकठिकाणी दगडांचा खच पडला तर जखमी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे, रामदास कुंभार, सुनील दीपचंद राठोड, रमेश शंकर कुमावत, प्रीतम सुधाकर बरकले, हितेश गणेश महाजन, संजय शांताराम खंडारे, अतुल सुभाष पवार, आकाश गोकुळ पाटील, भावेश प्रकाश देवरे, कृष्णा नामदेव शेळके, मेहून मनोज कुमार शहा, राहुल प्रमोद निकम, उत्तम विठोबा चौधरी, किरण चंदुकर, दीपक कारभारी रोटे, विजय सुनील काळे, जितेंद्र नथू ठाकरे आदी जखमी झाले आहेत.
अडीच तास वाहतूक रोखली
आक्रमक जमावाने पाचोरा, बोदवड व जळगाव रोडवर रास्तारोको केला. यात पाचोरा उपविभागाचे डीवायएसपी धनंजय वेरुळे यांचे वाहन काही वेळ रोखून धरले तसेच जळगाव, भुसावळ रस्त्यावरील वाहतूकही अडीच तास रोखली. अचानक झालेल्या प्रकारामुळे शहरातील व मुख्य भागात धावपळ उडाली. त्यानंतर दुकानेही बंद झाली होती. साधारण आठ वाजेला दगडफेक सुरू झाली. यात जमावाने काही मोटरसायकलींची तोडफोड केली तर एक मोटरसायकल जाळून टाकली व टायर पेटवले. सुमारे 15 ते 20 मिनिटे धुडगुस घातला. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी काही सहकार्यांच्या मदतीने जमावावर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला पण जमावाने पोलिसांवरच प्रतिहल्ला केला.
जिल्हाधिकार्यांनी घेतली जखमींची भेट
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह जखमी पोलीस कर्मचार्यांवर जामनेर व जळगाव येथे उपचार करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमींची भेट घेऊन योग्य ते उपचार करण्यात येण्याच्या सूचना मेडिकल कॉलेजचे डीन यांना दिल्या.
जामनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त
जामनेर पोलीस ठाण्याबाहेरील दंगलीनंतर जळगाव जिल्ह्यातील दोन एसआरपी व धुळे येथील दोन एसआरपी अशा एकूण चार तुकड्या जामनेरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशनमधून प्रत्येकी सात ते आठ कर्मचारी यांची नियुक्ती जामनेर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्याने जामनेर शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.
जामनेरात रूट मार्च : शांतता राखण्याचे आवाहन
जामनेरात झालेल्या दगडफेक व जाळपोळनंतर शहरातील तणावाचे वातावरण पाहता शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास जामनेर शहरात पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च केला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शहरवासीयांना आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, संपूर्ण व्यवहार सुरळीत ठेवावे, असे आवाहन केले.
14 आरोपींना अटक : अन्य संशयीतांचा कसून शोध
पोलिसांवर दगडफेक करणार्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न केले जात असून आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पाचोरा विभागाचे उपअधीक्षक धनंजय येरूळे यांनी दिली. अत्याचार व खून प्रकरणात आरोपी सुभाष भिल्ल यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या घटनेतील उर्वरित आरोपींची शहानिशा करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांवर दगडफेक करणार्या कोणत्याच आरोपीला सोडण्यात येणार नाही, असे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले.
