भुसावळ बसस्थानकाचे रेल्वे जागेवर होणार स्थलांतर !

रेल्वेला मिळणार बसस्थानकाची जागा : लोकप्रतिनिधींची चर्चा : मेमूसह महाराष्ट्रच्या वेळेत बदलाची मागणी


Bhusawal bus station will be shifted to the railway station! भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाचे पुर्ननिर्माण होत असून त्या अंतर्गत रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे. या अनुषंगाने रविवारी लोकप्रतिनिधी व डीआरएम यांच्यासोबतच्या बैठकीत बसस्थानकाची जागा रेल्वेला व बसस्थानकासमोरील रेल्वेची जागा बसस्थानकाला देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासन व रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असून महिनाभरानंतर त्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, महाराष्ट्रसह मेमू गाडीच्या वेळेत बदल करावा, भुसावळातील अंडरपासची कामे पूर्ण करावीत, बोदवड येथील आरयुबीचा प्रश्न सोडवावा, अजंता एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार रकावा यासह भुसावळ विभागातील व जळगावातील प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

डीआरएम कार्यालयात बैठक
रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथील डीआरएम कार्यालयात रविवारी सकाळी 11 वाजता बैठक झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदींची उपस्थित होती. चाळीसगाव, पाचोरा या भागातून अपडाऊन करणार्‍या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे मात्र महाराष्ट्र एक्स्प्रेस व मेमू गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने त्यात बदल करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.



भुसावळात सुरू व्हावा कंटेनर डेपो
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ शहरात कंटेनर डेपो सुरू करण्याची मागणी केली. कंटेनर डेपो सुरू झाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असेही ते म्हणाले. बोदवड येथील आरयुबी बोगद्याचा प्रश्न, तसेच सावदा रेल्वे स्थानकावरील मालधक्यावर शेडची गरज असून पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे ात्काळ शेडची निर्मीती करावी जेणे करून गैरसोय होणार नाही, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

मेमूसह महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ बदलवा : आमदार मंगेश चव्हाण यांची मागणी
चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेस व देवळाली भुसावळ मेमू गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. या गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी सुध्दा जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या अद्यावतीकरणाचा मुद्दा उपस्थित करीत शेडची मागणी केली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी सुध्दा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन करावे, असे त्या म्हणाल्या. पाचोरा-जामनेर या नवीन ब्रॉड गेज लाईनीसाठी नव्याने भूमी अधिग्रहण केले जाणार असून या कामाचे टेंडर निघाल्याचे डीआरएम म्हणाल्या.

यांची होती बैठकीला उपस्थिती
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, एडीआरएम सुनील कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, वरिष्ठ मंडळ अभियंता तरुण दंडोतिया व अन्य अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !