वाळू माफियांची दादागिरी कायम : पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर नेताना तलाठ्याला ठार मारण्याचा प्रयत्न


जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करताना महसुल पथकाने ट्रॅक्टर पकडले. हे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेत असताना चालकाने ट्रॅक्टर पलटी करत तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार, 24 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमाररास एरंडोल येथे नदीवरील पुल ओलांडताना मरीमाता मंदीराजवळ घडली.

तलाठ्याला मारण्याचा प्रयत्न
अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनाविरोधात कारवाई करण्यासाठी एरंडोल तहसिल कार्यालयातील पथक संध्यकाळी मार्गस्थ झाले. यात तलाठी सागर कोळी (32, रा.पारोळा) हेही होते. एरंडोल-उत्राण रोडवर तिवारी यांचे स्टोन क्रेशर समोर अवैध वाळु वाहतुकीचे विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर व ट्रॉली पथकाला मिळून आले. या ट्रॉलीतून दीड ब्रास वाळु अवैधरित्या वाहतूक करत असल्याचा प्रकार समोर आला. पथक प्रमुख यांच्या आदेशानुसार तलाठी कोळी हे ट्रॅक्टरवर बसून वाळुचे वाहन पोलीस ठाण्यात आणत होते.

ट्रॅक्टर केले पलटी
नदीचा पूल ओलांडत ट्रॅक्टर एरंडोल शहरात आणत असताना एका मोटार सायकलवर तीन इसम बसून आले. त्यातील एकाने चालकाला ट्रॅक्टर पलटी करण्याचे सांगितले. त्यानंतर चालकाने वेगाने घेत ट्रॅक्टर वळवित चालकाने विरुध्द दिशेला उडी मारली. हे ट्रॅक्टर पलटी करुन तलाठी यांना मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळताच अमळनेरचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर, पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणी तलाठी सागर कोळी यांच्या तक्रारीनुसार ट्रॅक्टर चालकासह दोघांविरोधाविरुध्द एरंडोल पोलीस ठाण्यात मंगळवार, 25 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !