धूम स्टाईल मोबाईल पळवणारी टोळी शनीपेठ पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : नेरी नाका परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून दोन संशयित दुचाकीने पसार झाले होते. ही घटना मंगळवार, 2 रोजी रात्री 9.30 घडली होती. शनिपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तसेच गोपनीय माहितीनुसार तपासाचे चक्र गतिमान केले. दोन संशयित व एक अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घेत मोबाइल पळविणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. संशयितांकडील नेरीनाका येथून हिसकावलेल्या मोबाईलसह सहा अँड्राईड मोबाइल व चोरून नेलेली दुचाकी असा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. अजहर आलम अन्सारी (रा.कात्रज, पुणे, कोंडवा पुणे मन्नत गार्डन अपार्टमेंट, पुणे, ह.मु. तांबापुरा) तसेच त्याचा साथीदार फैजान खान आरीफ खान (रा. बिस्मिल्ला चौक, तांबापुरा) अशी संशयितांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाचाही यात सहभाग आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नेरी नाका येथील मोबाईल चोरीप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारे मोबाईल पळविण्याचे गुन्हे जळगाव शहर, रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत घडले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सूचित केले होते. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी पथक नेमून तपासाच्या सूचना केल्या. पथकाने तपासात नेत्रमचे टेक्निशियन महेश वर्मा, पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, पंकज खडसे, मोहसीन शेख यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहितीही प्राप्त केली. त्यानुसार चैन स्नॅचिंग संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पथकाच्या हाती लागलेली दुचाकी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात शनिपेठ डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील, योगेश साबळे, रवींद्र तायडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !