जळगावातील हुडको परिसरात सव्वा लाखांची घरफोडी
जळगाव : चोरट्यांची दिवसेंदिवस हिंमत वाढत आहे. दरवाजा उघडा असलेल्या घरात प्रवेश करत चोरट्यांनी पेटीचा कडीकोयंडा तोडून सुमारे 1 लाख 20 हजार 199 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवार, 11 रोजी सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास शहरातील पंचशील बिल्डिंग भीम विहार, शिवाजीनगर हुडको परिसरात ही घटना घडली.
उघडा दरवाजा आयतीच संधी
आनंदपाल बाबुराव बाविस्कर (वय 53, रा. पंचशील बिल्डिंग भीम विहार) हे कुटुंबासह या ठिकाणी वास्तव्यास आहेत. पहाटे झोपेतून उठल्यानंतर नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर चोरट्याने या दरवाजातून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील पेटीचे कडीकोयंडा व कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केला. या पेटीतील सोन्याचे दागिने घेत चोरटे पसार झाले.

असा लांबवला मुद्देमाल
17 हजार 655 रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 29 हजार 425 रुपये किमतीची सहा ग्रम सोन्याची चैन, 31 हजार 368 रुपयांची दहा ग्रॅम सोन्याची चैन, 9 हजार 700 रुपयांची दोन ग्रॅम सोन्याची बाळी, 24 हजार 259 रुपयांची चार ग्रॅम सोन्याची बाळी, 779 रुपयांची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, असा एकूण सुमारे 1 लाख 20 हजार 199 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. चोरीनंतर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी गुरुवार, 11 रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर हे करीत आहेत.
