व्यसन हे केवळ व्यसनच, त्यासाठी कुठलीही सुरक्षित पातळी नाही : प्रा.डॉ.दयाघन राणे
भुसावळ : व्यसन लागण्यासाठी कारणीभूत असणार्या अंमली पदार्थाचे सेवन करण्याची कोणतीही सुरक्षित पातळी नसते त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा, असे आवाहन भुसावळ येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले. ‘चला व्यसनाला गुड बाय म्हणू या’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. व्यसनांचे निरनिराळे प्रकार सांगून व्यसन लागण्याची कारणे सांगितली. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ शरीरासाठी कशा पद्धतीने घातक आहेत हे त्यांनी विविध उदाहरणे देवून स्पष्ट केले. तसेच व्यसन सोडण्यासाठी असणार्या काही पद्धती सांगून कुणाला गुटखा दारू किंवा अन्य अमली पदार्थाचे व्यसन असेल तर ते कसे सोडवायचे हे सुध्दा त्यांनी स्पष्ट केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा उषा पुराणिक होत्या. त्या म्हणाल्या की, व्यसन लागू नये म्हणून सतत जागरूक राहणे आवश्यक आहे शिवाय कुणाला कसलेही व्यसन असेल तर मनाचा संयम पाळत व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी केले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी प्रसारित केलेल्या व्यसनमुक्तीच्या शपथेचे वाचन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले. प्रा.डॉ.दयाघन राणे यांचे स्वागत उषा पुराणिक यांनी केले. सूत्रसंचालन अलका ढाके यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय मदन बोरकर यांनी दिला. आभार संजय चापोरकर यांनी मानले.





