चाळीसगाव तालुक्यात पत्नीचा खून : आरोपी पतीला मरेपर्यंत जन्मठेप !
चाळीसगाव : कौटुंबिक कारणातून पत्नीचा कुर्हाडीने निर्घृण खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात घडली होती. या खुनातील आरोपी पती भिकन भाऊराव पवार याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जे.जे.मोहिते यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा शनिवार, 20 जुलै रोजी दुपारी चार वाजता सुनावली.
असे आहे प्रकरण
वाघडू गावातील भिकन भाऊराव पवार याने कौटुंबिक वादातून पत्नी अन्नपूर्णा भिकन पवार यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना 18 मे 2019 रोजी पहाटे 5 वाजता घडली होती. जखमी अवस्थेत महिलेला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असता 19 मे 2019 रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

13 साक्षीदारांची नोंदवली साक्ष
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये फिर्यादी पोलीस पाटील तसेच तपासाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दरम्यान घटनेतील आरोपी भिकन पवार याच्यावर या घटनेच्या तीन महिन्यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर आणण्यात आले. त्यावरून आरोपीने पत्नी अन्नपूर्णा पवार या महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांनी आरोपी भिकन पवार याला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल दीपक दिलीप सत्रे आणि पैरवी अधिकारी पोलीस नाईक चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.
