साग लाकडाची चोरटी वाहतूक : अटकाव करणार्या वनमजुरावर चाकू हल्ला
अडावद : वन क्षेत्रातील सागाचे लाकुड तोडुन त्याची दुचाकीवरुन चोरटी वाहतूक संशयित करत होता. हा प्रकार लक्षात येताच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. संशयिताने रोपन संरक्षण मजुराला धक्काबुक्की करत कमरेचा चाकुने वार करत रोपन संरक्षण मजुराला जखमी केले. ही घटना शुक्रवार, 19 रोजी 11.50 वाजेच्या सुमारास कुंड्या पाणी ते वरगव्हाण रोडवर घडली.
वनमजुरावर केला चाकू हल्ला
जिब्राहिम राजु तडवी (30, रा.बीडगाव) हे वन क्षेत्रामध्ये रोपन संरक्षण मजुर म्हणून कार्यरत आहेत. वनक्षेत्रातील सागाचे लाकुड तोडून संशयित दुचाकीने नेत असल्याचे तडवी यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी चालकाजवळ जावून तपासणी केली असता त्याच्या गोण्यामध्ये सागवानी लाकडाचे तुकडे मिळुन आले. तडवी यांनी संशयिताचे नाव विचारले असता नदिम बेग शेख (रा.अडावद) असे सांगितले.

दरम्यान पुढील कारवाई करण्यासाठी तडवी हे संशयिताला सोबत चल असे म्हणाले. याचा राग येऊन संशयिताने तडवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने त्याच्या कमरेचा चाकु काढत तो रोपन संरक्षण मजुराच्या उजव्या हातावर मारुन वार केला. या प्रकरणी तक्रारीनुसार अडावद पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जयदिप राजपूत हे करीत आहेत.
