चोपडा तालुक्यात 11 लाखांचा गांजा जप्त : एका आरोपीला बेड्या


अडावद, ता.चोपडा : अडावद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे विष्णापूर ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरातून तब्बल 11 लाख 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या धडक कारवाईने जिल्हाभरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे तर एका आरोपीला अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (36) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका गोडावून वजा पत्रीशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गांजा बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने शुक्रवार, 27 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे एपीआय संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, हवालदार भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतीश भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने छापा मारुन 11 लाख 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.

सहा हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल यासह सायसिंग बारेला यास अटक करण्यात आली. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अन्वर तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !