पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : हतनूरचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले
भुसावळ : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्या हतनूर धरणाचे यंदाच्या हंगामात प्रथमच पूर्ण क्षमतेने 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता 12 तर त्यानंतर पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने तापीला पूर आला आहे.
पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात मुसळधार पाऊस झाला. त्यात बर्हाणपूर, डेडतलाई, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहटार व अकोला भागातील पावसामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्णपणे सकाळी दहा वाजेला उघडण्यात आलेले होते व नंतर टप्प्या-टप्प्याने प्रत्येकी दोन दरवाजे उघडून आता 14 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

24 तासात झालेला पाऊस असा
बर्हाणपूर – 18.6
देढतलाई – 22.4
टेक्सा – 65.4
एरडी – 17.8
गोपालखेडा – 13.6
चिखलदरा – 69.8
लखपुरी – 11.2
लोहारा – 7.2
अकोला – 22.8
एकूण – 248.8 मि. मी.
सरासरी – 27.6 मि. मी.
हतनूरमध्ये रविवार (दि.28) रोजी रात्री बारा वाजता पाणी पातळी – 210.500 मी. झालेली असताना एकूण पाणी साठा 214.00 दलघमी. तर एकुण पाणी साठा टक्केवारी 55.15 टक्के नोंदविण्यात आली. यावेळी धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. तर 432 क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आले होते. तर सोमवार (दि.29) रोजी सकाळी सात वाजता 210.740 मी. इतका पाणीसाठा जमा होत तो 57.63 टक्के नोंदविण्यात आला असून यावेळी धरणाचे आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी 8 वाजता 226 दलघमी पाणीसाठा होऊन 58.25 टक्के नोंदविण्यात आला. तर अवघ्या दोन तासाने म्हणजेच दहा वाजता पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 230.50 दलघमी पाणीसाठा झाल्याने 41 पैकी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे तर 1822 क्सुसेकने विसर्ग सुरु आहे.
हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
