भुसावळात कोम्बिंगदरम्यान गावठी कट्ट्यासह दोघे संशयीत जाळ्यात
भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ संशयीत इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या भागात कोम्बिंग राबवत दोघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच चारचाकी जप्त करण्यात आली. रविवारी पहाटे सव्वार चार वाजता ही कारवाई करण्यात आली. दीपक संजय चौधरी (35, रा.रामदेव बाबा मंदिराजवळ, भुसावळ, ह.मु.लोणवाडी, ता.बोदवड) व कुंदन रामदास वानखेडे (25, रा.रामदेव बाबा मंदिराजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पालिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, एएसआय तस्लिम पठाण, सुनील जोशी, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, नेव्हिल बाटली, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी आरोपींना अटक केली.
कट्टा व चारचाकी केली जप्त
आरोपी कुंदन याच्या अंगझडतीत दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तसेच 60 हजार रुपये किंमतीची लाल रंगाची चारचाकी (एम.एच. 43 एन.6350) जप्त करण्यात आली.



