जळगाव विधानसभा निवडणूक : भाजपात वाढली इच्छुकांची संख्या
जळगाव (13 सप्टेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन महिन्यांचा अवकाश असलातरी इच्छुकांनी मात्र मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. जळगाव शहरात लेवा व मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मते असून गत दोन पंचवार्षिकपासून भाजपाचे राजूमामा भोळे हे जळगाव शहरातून विधानसभेवर निवडून जात आहेत. आताही भाजपाकडून त्यांच्या नावाची चर्चा असलीतरी भाजपामध्ये मात्र इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपा ऐनवेळी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार ? याकडेही लक्ष लागले आहे.
भाजपामधून इच्छूकांची वाढली संख्या
भाजपाकडून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, रोहित निकम, डॉ.अश्विन सोनवणे, डॉ.केतकी पाटील तर विरोधी पक्षाकडून जयश्री महाजन, कुलभुषण पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

लोकसभेत पडझड झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून सावध खेळी खेळली जाण्याची दाट शक्यता आहे. जरांगे फॅक्टर लक्षात घेता भाजपकडून जिल्ह्यात मराठा कार्ड खेळले जावू शकते? अशीदेखील चर्चा आहे.
तर रोहित निकम यांच्या नावाचा पर्याय
भाजपकडे आजच्या घडीला चाळीसगाव मतदारसंघातून मंगेश चव्हाण हे एकमेव मराठा आमदार आहेत त्यामुळे चाळीसगावसह जळगाव शहरातही मराठा कार्ड खेळले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपाने मराठा समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविल्यास भाजपाकडून मार्केटींग फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचे नाव ऐनवेळी पुढे येवू शकते, अशीदेखील चर्चा आहे.




