राजस्थानमध्ये लक्झरी-टेम्पोमध्ये भीषण अपघातात 11 प्रवासी ठार
11 passengers killed in luxury-tempo accident in Rajasthan धौलपूर (राजस्थान) (20 ऑक्टोबर 2024) : राजस्थानच्या धौलपूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात तब्बल 11 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये पाच लहान मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. राजस्थानच्या धौलपूरजवळ लक्झरी व टेम्पोत धडक झाल्यानंतर अपघात झाला तर अपघातप्रसंगी सर्व प्रवासी टेम्पोत साखरझोपेत होते.
एनएच 11बी वरील सुनीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. सर्व मृत बाडी शहरातील गुमट मोहल्ल्याचे रहिवासी आहेत. बरौली येथील त्यांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमाला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला आहे.
अपघातात बसचेही नुकसान झाले असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. टेम्पोतील प्रवासी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बसचा वेग खूप होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर हायवेवरून जाणार्या इतर वाहनांतील प्रवाशांनी जखमींना मदत केली, तसेच पोलिसांना माहिती दिली. काही जण गंभीररित्या जखमी होते. परंतू हॉस्पिटलच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला.