भुसावळच्या तापी पात्रात आत्महत्या केलेल्या बांभोरीतील युवकाचा मृतदेह सापडला
भुसावळ (20 ऑक्टोबर 2024) : भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात गुरुवार, 17 रोजी रात्री बांभोरी येथील युवक अविनाश सोनवणे (24) याने तापी पुलावरून रात्री 10 वाजता उडी मारली होती. गेल्या दोन दिवसांपासून बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरू असताना शनिवारी घटनेच्या तिसर्या दिवशी जुगादेवी परिसरात नदी पात्रात अविनाशचा मृतदेह सकाळी 11 वाजता पथकास मिळाला.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गुरुवार, 17 रोजी रात्री बांभोरी येथील युवक मोटरसायकलने एक महिला व युवतीसोबत तापी नदीच्या पुलावर आला. यावेळी त्यांच्यात काही वाद झाल्यानंतर तरुणाने थेट पूलावरून रात्रीच्या अंधारात तापी नदीत उडी मारली. यामुळे दोन्ही महिला ओरडू लागल्यात यामुळे रस्त्याने येणार्या-जाणार्यांनी थांबून चौकशी केली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे व त्यांच्या सहकार्यांनी तापी नदी गाठली. अविनाश याच्या घरी माहिती देण्यात आल्यानंतर परिवारातील भाऊ, वडील, काका यांच्यासह मित्र परिवाराने धाव घेतली.

शहर पोलिसात नोंद
गुरुवारी रात्रीपासूनच शोध मोहिम सुरू करण्यात आली मात्र गुरुवार, शुक्रवारी सुध्दा बचाव पथकाने केलेल्या शोध मोहिमेत अविनाशचा शोध लागला नाही, मात्र शनिवारी बचाव पथकाला व पोलिसांना जुगा देवी मंदिराकडील नदीत फुगलेल्या अवस्थेत अविनाशचा मृतदेह आढळला. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, दीपक शेवरे, अ.रज्जाक यांनी पंचनामा केला. मृत अविनाशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ट्रामा केअर सेंटरला होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.
