भुसावळात सार्वजनिक जागांवर दारू पिणार्यांवर पोलिसांची कारवाई
भुसावळ (20 ऑक्टोबर 2024) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सात नंबर पोलिस चौकीजवळ झोपडी करीत दारू पिणार्यांवर शहर पोलिसांनी कारवाई करीत दोन जणांवर गुन्हा दाखल केल्याने मद्यपींच्या गोटात खळबळ उडाली.
उघड्यावर दारू पिणार्यांवर होणार कारवाई
शहरातील डॉ.आंबेडकर मार्गावरील सात नंबर पोलीस चौकीपासून आतमध्ये रेल्वेने तोडलेल्या अतिक्रमणामुळे मोकळ्या झालेल्या जागेत काही जणांनी झोपडी बांधून तेथे संध्याकाळच्या वेळी दारू पिणे सुरू केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेत अनेक जण संध्याकाळच्या वेळी दारू पित असल्याने अश्या मोकळ्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश डीवायएसपी पिंगळे यांनी बाजारपेठ व शहर पोलिसांना दिले आहे.

दारू पिणारे आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने पोलिसांची ही मोहिम सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सुनील सुखदेव पवार (रा. द्वारका नगर, भुसावळ) व आकाश श्री ओम बारसे (रा. आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्याविरूध्द पोलीस कर्मचारी दीपक शेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
