अवैध दारूसह शस्त्र तस्करी व रोकड वाहतुकीवर टाच
रावेरात महाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डर मीटिंग : निवडणूक काळात चोख बंदोबस्ताचे नियोजन
Crack down on arms smuggling and cash traffic along with illegal liquor रावेर (24 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या शेजारच्या जिल्ह्यातील अधिकार्यांसोबत बॉर्डर मीटिंग बुधवारी झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सीमेवर चेक पोस्ट उभारण्याचा निर्णय झाला तसेच गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून अवैध दारू रोखण्यासह शस्त्र तस्करी व रोकड वाहतूकीवर काटेकोर नजर ठेवण्याबाबत तसेच निवडणूक काळात सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे होते.
समन्वय ठेवण्याचे आश्वासन
रावेर शहरातील पंचायत समितीच्या हॉलमध्ये ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील गुन्हेगाराबाबत चर्चा झाली. निवडणूक काळात अवैध दारू तसेच रोख स्वरूपात पैसे नेणार्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. दोन्ही राज्यांच्या अधिकार्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवण्याचे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला प्रांताधिकारी बबनराव काकडे, बर्हाणपूर प्रांताधिकारी पल्लवी पुराणिक, विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, बर्हाणपूर उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव पाटील, रावेर तहसीलदार बंडू कापसे, बर्हाणपूर तहसीलदार रामलाल पगारे, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, टीआय अमिल सिंह जादौग, वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनक्षेत्रपाल बर्हाणपूर अजय सागर, गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे, वनक्षेत्रपाल पियूष चौधरी, टीआय कैलास चव्हाण, एएसआय हेलापडावा, संतोष चौधरी यांच्यासह मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते.
