भुसावळात रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरतात तेव्हा…!

भुसावळातील सुरक्षा यंत्रणा सतर्कतेत पास : मॉक ड्रिल कळताच प्रवाशांना दिलासा


When terrorists enter railway station in Bhusawal…! भुसावळ (24 ऑक्टोबर 2024) : भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बुकींग कार्यालयानजीक रेल्वे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तोंडाला पांढरा रूमाल बांधून 30 ते 35 वयोगटातील दोन संशयीत अतिरेकी घातपाताच्या उद्देशाने शिरल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच यंत्रणेत खळबळ उडाली. हा प्रकार पाहता-पाहता प्रवाशांची मोठी गर्दी जमली वाढू लागली तर काही क्षणात ही बातमी रेल्वे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांना सतर्कतेच्या सूचना देत अफवा पसरणार नाही याची काळजी घेतली तर जिल्ह्यावरून दंगा काबू पथकासह पोलिस यंत्रणा दाखल झाली. दीड तासाच्या परीश्रमानंतर कथित दशतवाद्यांना ताब्यात घेण्यात सुरक्षणा यंत्रणांना यश आले. अर्थात हा सर्व प्रकार मॉकड्रिल (सतर्कता चाचणी) असल्याचे कळताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. आगामी सण-उत्सव व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सुरक्षा चाचणी घेण्यात आली व त्यात स्थानिक सुरक्षा यंत्रणा पास झाल्या.

अफवा, धावपळ व सतर्क यंत्रणांची सतर्कता
बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास जीन्स पँट व टी शर्ट परिधान केलेले व तोंडाला रूमाल बांधून आलेले दोन तरुण घातपाताच्या उद्देशाने रेल्वे स्थानकातील दक्षिण बाजूकडील तिकीट बुकींग कार्यालयाच्या रूममध्ये गेल्याची माहिती प्रवाशांना कळताच त्यांनी यंत्रणेला कल्पना दिली. लोहमार्ग पोलिसांना घटना कळताच लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना व दहा कर्मचार्‍यांची टीम तसेच लोहमार्ग पोलीस निरीक्षक एपीआय किसन राख, क्यूआरटी टीम तसेच जळगाव बीडीएस, बाजारपेठ पोलीस तसेच डॉग स्कॉड व जीआरएम टीमला पाचारण करण्यात आले.

अन प्रवाशांच्या जीवात आला जीव
यंत्रणा दाखल होताच सुरूवातीला परीसर निर्मनुष्य करण्यात आला तर शस्त्रसज्ज जवानांनी काही क्षणात आश्रयाला लपलेल्या दोघा कथित संशयीतांना शस्त्राच्या धाकावर गुडघ्यावर आणत ताब्यात घेतले. सुरूवातीला स्थानकात अतिरेकी शिरल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये काही क्षणापुरता भीती पसरली मात्र नंतर हे केवळ सतर्कतेचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) असल्याचे कळताच प्रवाशांच्या जीवात जीव आला.

सतर्कतेची घेतली चाचणी
सण-उत्सवाच्या काळात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक अफवा यंत्रणांच्या कानावर येतात तसेच अनेकदा निनावी दूरध्वनी येतात वा वेळप्रसंगी बेवारस बॅग आढळल्यानंतर यंत्रणांचा गोंधळ उडतो. या पार्श्वभूमीवर यंत्रणेची सतर्कता व सज्जता तसेच आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर सुरक्षणा यंत्रणांनी बुधवारी सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान रेल्वे स्थानकावरील बुकींग खिडकीजवळ मॉक ड्रिल घेत यंत्रणा सजगतेची चाचणी घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !